Friday, July 20, 2012

व्यावसायिका व्हायचंय, करा ऍग्रीक्‍लिनिक व ऍग्रीबिझनेस

केंद्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत "मॅनेज' हैदराबाद या संस्थेच्या माध्यमातून ऍग्रीक्‍लिनिक ऍण्ड ऍग्रीबिझनेस हा कोर्स सन 2002-2003 पासून सुरू झाला. प्रत्येक राज्यामध्ये हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी निवड मॅनेज, हैदराबाद यांच्यामार्फत केली जाते. महाराष्ट्रामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाते. हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅनेज हैदराबादमार्फत प्रमाणपत्र दिले जाते.
हा कोर्स पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावरती विद्यार्थ्यांना 20 लाखांपर्यंत कर्ज राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅंकेतून मिळते. यासाठी नाबार्डमार्फत 44 टक्के अनुदान महिला आणि एस्सी, एसटी विद्यार्थ्यांना तसेच 36 टक्के अनुदान इतरांना मिळते. पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर पुन्हा 20 लाख रुपयांचे कर्ज मिळते. त्यासाठी तेवढेच अनुदान मिळते. त्यामुळे कृषी उद्योजकांना जास्तीत जास्त लाभ होत आहे. कृषी पदवीधारकांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी या कोर्समध्ये त्यांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच व्यवसायातील बारकावे सांगितले जातात. 

संतोष गोडसे, योगेश पाटील 

उद्देश  1) कृषी विस्तार व सेवा सल्ला सुविधा मोफत देणे किंवा ठराविक फी घेऊन मार्गदर्शन करणे, निविष्ठा खरेदी करणाऱ्या शेतकरी गटांना गरजेवरती आधारित मार्गदर्शन करणे. 
2) कृषी विकासास चालना देणे. 
3) कृषी क्षेत्रातील कृषी पदवीधर, पदविकाधारक, दुग्ध व्यवसाय पदविकाधारक इ. सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय सुरू करून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक तयार करावेत. 

प्रवेश कोणाला? 
1) कृषी पदवीधर 
2) कृषी पदविकाधारक 
3) दुग्ध व्यवसाय पदविकाधारक 
4) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कृषी पदविकाधारक आणि पदवीधर. 
5) कृषी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी 

प्रशिक्षण कालावधी व अभ्यासक्रम 
ऍग्रीक्‍लिनिक व ऍग्रीबिझनेस हा कोर्स दोन महिने कालावधीचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त 500 रुपये फी आकारली जाते. 

प्रशिक्षणार्थीची प्रशिक्षणाची निवड 
ज्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घ्यायचे आहे ते विद्यार्थी आपली नावनोंदणी मॅनेज हैदराबादमार्फत नेमलेल्या संस्थेमध्ये करतात. नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलविले जाते. एका बॅचसाठी 35 विद्यार्थी निवडले जातात. 

प्रशिक्षणाचे स्वरूप - 
विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण, कृषिविषयक व्यवसायांची माहिती, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि यशस्वी व्यावसायिकांच्या उद्योगांना भेटी देऊन त्यांमध्ये व्यवसायाची गोडी निर्माण केली जाते. नंतरच्या टप्प्यामध्ये कृषी व कृषिपूरक व्यवसायांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. आपला व्यवसाय निवडण्यास सांगितले जाते. यशस्वी उद्योजकांना मार्गदर्शनासाठी बोलाविले जाते आणि त्यांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी सुरवातीपासून घेतलेले कष्ट, आलेल्या अडीअडचणींवर केलेली मात याची माहिती दिली जाते. उद्योगासाठी परवाना मिळविण्यापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतचे सर्व बारकावे सांगितले जातात. अशा उद्योजकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते. 
विद्यार्थ्यांनी व्यवसाय निवड केल्यानंतर त्यांनी जो व्यवसाय निवडला आहे त्या व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी 15 दिवस पाठविले जाते. या 15 दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांनीच व्यवसायाच्या ठिकाणी स्वतः काम करायचे असते. तसेच विद्यार्थांना प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव दिला जातो. स्वतः काम केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामातले बारकावे लक्षात येतात. ज्या वेळेस आपला उद्योग सुरू होईल, त्या वेळेस जास्त अडचणींना सामोरे जावे लागणार नाही असा आत्मविश्‍वास येतो. याचबरोबरीने कच्चामाल खरेदी, साठवण, प्रक्रिया, पॅकिंग, विक्री व्यवस्था, ग्राहकांची मानसिकता, डीलर लोकांशी संवाद, जमा-खर्चाचे गणित याची माहिती मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, बारामती मार्फत हा कोर्स चालविला जातो. आतापर्यंत या केंद्रातून 318 कृषी पदवीधारक आणि पदविकाधारकांनी कोर्स पूर्ण केला आहे. त्यापैकी 160 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केले आहेत. 

प्रकल्प अहवाल  विद्यार्थ्यांनी निवडलेल्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल त्यांनाच तयार करण्यास सांगितला जातो. यासाठी बॅंकेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दिले जाते. बॅंकेच्या नियमानुसार अहवाल प्रत्येक विद्यार्थ्यांकडून तयार करून संबंधित बॅंकेत जमा केला जातो. सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर संबंधिताला कर्ज मिळते. त्यानंतर सहा महिन्यांमध्ये "नाबार्ड'मार्फत अनुदान दिले जाते.